Monday 20 May 2013

सफर कोकणची

करूया सफर कोकणची
दापोलीच्या आंजर्ले गावाची
आंबे फणस कोकम काजूची
लज्जत अवीट गोडी चाखायची

बैलगाडीच्या खडखड आवाजाची
बैलांच्या खण खण घंटांची
मायेने  बैलांना हाकायची
देवळाच्या दारात पोचायची

भजन आरतीत गुंगून रमायची
फुलांच्या वासात ,
कापराच्या उजेडात
ऒढ  लावी देवदर्शनाची

सागराच्या लाटात डुंबायची
शंख शिंपले वेचायची
वाळूच्या किल्ल्यात गुंगायची
मजेत डुलत उंडारायची
गुदगुदी ढकलाढकली करायची

मस्त ही पोटपूजा करायची
कोकम सार आणि  काजूची उसळ
तिखट मिठाची मस्त ती चंगळ
आमरस पुरीचा मिठास बेत
फणसाच्या गरयावर   मारुया हात









Tuesday 23 April 2013

मायेची महती

मायेची महती 

माया आईची मऊ साईची
फुल जाईची अति कोमल
माया पित्याची वारसा देण्याची
छाया घरट्याची निरंतर
माया भावाची पाठ राखायची
भाऊबीज घालायची प्रेमभावे
माया बहिणीची राखी बांधायची
प्रेम जपण्याची आनंद मानण्याची
माया आजीची खाऊ घालायची कौतक करायची नात नातवांची
माया आजोबांची गोष्टी सांगण्याची
धाडस शिकवायची आदर्श ठेवायची
माया आत्याची लाड करायची
सोहळे पुरवायची हौस भारी
माया मावशीची गुपित सांगण्याची
हितगुज कार्याची थट्टा मस्करीची
माया मामाची कामी  येण्याची
साद प्रेमाची पाखर घाली
माया मैत्रीची गुजगोष्टी करायची
अल्लद प्रेमाची साक्ष देई
माया सजणाची स्वप्ने रंगवायची
प्रेम उधळायची एकमेकांवरी
माया गुरुरायाची भक्ती शिकवायची
भेट घडवून द्यायची  परमेशाची





माझी आजी


माझी आजी 


आमची आजी फारच भोळी
उपवासाला खाते साजूक तूप केळी
देवाला देते नेवेद्याची लाच
सारखे नवस बोलण्याची
तिला आहे आच
आंबे केळी फणसाला
बदामाची जोड
नेवेद्याला करते सारखे गोड गोड
गोड धोड खाण्याचा देवाचा पहिला मान
नंतर सवाष्ण ब्राम्हणांचा सन्मान
घरातल्या माणसांचा शेवटचा नंबर
पण मी आहे खाष्ट सर्वांआधी हजर
माझा माझा वाटा प्रथम द्यायला लावते
मगच तिला मी खायला मोकळी सोडते
आटीव दुधाचा चहा व साजूक तुपाची खिचडी
इतक्या म्हातारपणी खुटखुटीत आहे कुडी
देव आणि आजीची लागली आहे रेस
शर्यत खेळत असताना लागेल मोठी ठेच
कोण पुढे जातो पैज लागली आमची
पण मानवावर सत्ता आहे ईश्वराची



सूर सावल्या -अरविंद गजेंद्रगडकर

अरविंद गजेंद्रगडकर यांनी आयुष्यातील सुंदर सफरीची गाथा सांगितली आहे. त्यांचे मित्र, गुरु, सहकारी व सहचर यांच्या गोड सफरीचे हे वर्णन वाचताना मन प्रसन्न आणि अवीट अश्या खुशीत दंग होऊन जाते. त्यांनी घेतलेला सूर सम्राटांचा व तालबहद्दुरांचा सहवासाचा आणि त्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचा यथासांग इतिहास आपल्याला थक्क करून सोडतो. नशिबाचे योगायोग व ध्येय प्राप्तीसाठी घेतलेले कष्ट म्हणजे आयुष्याचा सुखसंवाद यशस्विता आणि यथार्त असते. जगातील सुंदर गोष्टींचा सुखद अनुभव ध्येय प्राप्तीचा आनंद व चिरकाल स्मरणात राहणारे, दिल खुश ठेवणारे सुरांचे सौंदर्य व सहवासात येणारांची मैत्री हे जीवन सुखमय करते. निसर्गातील व मानवातील सुंदर गोष्टींचा संगम आपल्या तनामनात गुंतवून आनंदात सुखात आयुष्य व्यतीत करण्याचा हा सुंदर मार्ग आहे. हा संदेश मानणारा हा महात्मा आहे. संगीत विद्या म्हणून शिकणे आणि आपल्या ज्ञानाचा फक्त चरितार्थ म्हणूनच उपयोग न करता लोकांना सुरांच्या संचाराचा मुक्त आनंद देऊन त्याचा अनुभव घेणे हि दातृत्वाची कल्पना खूप सुंदर आहे. कलेची महानता आणि व्यक्तीची श्रोत्यांना सुख आनंद मिळवून देण्याची दानत हि परमोच्च कोटीची ठेव आहे. 

 पुस्तक ठेवा

Tuesday 14 August 2012

ढगांची रूपे

ढगा रे ढगा रंग तुझा न्यारा
कधी गोरा गोरा तर कधी भुरा भुरा
कधी रण रण तर कधी खडाजंगी
कधी लपालपी तर कधी झोम्बाझोम्बी
रोज रात्री तुझी हजेरी दिवसा तुझा खाडा
कधी हवामान तज्ञांशी करतोस राडा
कधी निसर्गाशी गट्टी
तर कधी रागावतोस फार
कधी गोंजारीशी तर कधी देई मार
चांदण्याशी लपालपी तर कधी प्रेम भारी
कधी तुझा तंटा तर कधी मैत्रीचा आवेग भारी
मैत्री आणि तंट्यात तुला वाटे गोडी
एकमेकांची अशी हि अजोड प्रीती खरी 

Friday 20 July 2012

पेंग्विनची दुनिया



आम्ही सकाळी पेंग्विन बघण्यास एका गुहेसारख्या ठिकाणी गेलो होतो. तसेच महासागरात राहणारे अगदी वितीपासून ते 25 -30 फुटापर्यंत लांबी असलेले मासे ठेवले होते.प्रथम त्यांची चित्रे व इतर माहिती म्हणजे आकार रंग त्यांची खास वैशिष्टे तिथे लिहिली होती.दूरदर्शनवर त्यांची पाण्यातील हालचाल दाखवत होते. शेजारी समुद्रावर पुष्कळ प्रकारच्या होड्या छोट्या नावा दिसत होत्या. माशांच्या तोंडाचा सांगाडा दातासकट ठेवून आत जाऊन फोटो काढता येत होते.व लहान मुलांसाठी "आत तोंडात जाऊन बस मी तुम्हाला चावणार किवा खाणार नाही असे लिहिले होते."
 माशांच्या आकाराच्या लोकरीचे ,कापडाचे टेडी बेअर सारख्या गोष्टी ठेवल्या होत्या  वेगवेगळ्या प्रकारच्या किल्या ठेवल्या होत्या. मुलांना माशाच्या आकाराचे कपडे घालून फोटो काढायची गम्मत करता येत होती.समुद्राच्या गार पाण्यात आपला हात किती वेळ ठेवता येतो अशी गम्मत होती.वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या रंगाची नक्षी असलेले खूप वजनाचे मासे होते.इंद्रधनुष्याच्या सर्व रंगाच्या छायेतले,  मातीच्या, पाण्याच्या,पानाच्या रंगाचे तसेच काही खूप जाडेजुडे काही खूप  पातळ काहींचे डोळे अतिशय चकाकणारे काही भयंकर चपळ काही पाणवनस्पती, मासे (छोटे) असा आहार घेणारे  काहींची पिले एक महिन्यात स्वावलंबी होतात प्रत्येकाला वेगवेगळी नावे  आहेत पाण्याच्या रंगात  सूर्याच्या उन्हात त्यांच्या पंखावरील व कल्ल्यावरील निरनिराळ्या रंगाच्या लहान मोठ्या डोळ्यामुळे  ते चकाकतात शिवाय त्यांच्या विविधतेमुळे  ते खूपच छान दिसतात . पाण्यातून फिरणाऱ्या माशांचा संचार संपूच नये असे इतके झपाटल्यासारखे वेडे व्हायला होते.निसर्गाची रंगाची पाण्याची खडकाची किमया थक्क करून सोडते. जसे कथा लिहिणे वाचणे चित्र काढणे चित्रपटातील हलते दृश्य बघणे यात जसा अधिकाधिक जिवंतपणा असतो तसे माश्यांचा जलविहार हि खूप अप्रतिम मनोहारी, संस्मरणीय, त्रिकालाबाधित, चिरंजीव व चिरंतन गोष्ट आहे निसर्गाचा चमत्कार सौंदर्य अगदी आपल्या मायेच्या  माणसावरील प्रेमा इतकी निरंतर जपणूक व त्याचा प्रत्यक्ष आनंद अनुभवण्यास उपलब्ध करून देणे हि अतिशय आनंदाची अभिमानाची आणि  कौतुकाची व गौरवास्पद बाब आहे.
समुद्राच्या पाण्याचा प्रवाह साठवून व हवेचा दाब कायम ठेवून एक गोल असा पाण्याचा  साठा करून त्यात पाणवनस्पती व खाद्य  असणारे मासे सोडून पेंग्विन साठी एक घर जे भूयारासारखे बंद केले आहे व चारी बाजूने एक गाडी फिरवली आहे. त्यात एक एक टप्प्याला सरकता पडदा ठेवून निरनिराळी दृश्ये दाखवतात.
प्रथम पाणबुड्या वेशातील माणसांचे पुतळे ,नंतर पाण्यात पोहणारे पेंग्विन हि दृश्ये खूपच सुंदर दिसत होती . काळी पाठ, पोट पांढरे व चोची व पाय लाल पिवळे दिसत होते.तेथील खडकावरून ते पाण्यात उड्या मारत होते. काठावर आल्यावर पंख  उंचावून दोन पायावर उभे राहून तुकुतुकू समोर बघत होते. तिथे फक्त त्या पाण्याला हात लावायचा नाही अशी सूचना होती.व गाडी बुटकी असल्यामुळे उभे राहायचे नाही असे सांगितले होते .
       दुसऱ्या  टप्प्यात पांढऱ्या  पांढऱ्या  बर्फासाख्या रंगाच्या दिसणाऱ्या खडकावर 15 -20 च्या कळपाने ते फिरत होते .त्यात दोन स्त्रिया त्यांची नखे छोटी व बोथट करत होत्या.तिथे बायका माणसांप्रमाणे प्राण्यापक्षांचीपण शिकून शुश्रुषा करतात त्यांना हाताळून प्रेम देतात व त्यांची शारीरिक व मानसिक  दुखे कमी करतात.   

Monday 2 July 2012

ज्येष्ठ व्यक्तींसाठी विरंगुळ्याची काही साधने

ज्येष्ठ व्यक्तींसाठी वैद्य किवा दवाखाना  कर्मचारी , समाजसेवक सेवाभावी लोकांनी या सूचनांचा अवश्य विचार करावा
  1. ज्येष्ठ व्यक्तींना भक्तीगीत,भावगीत यांच्या ध्वनिफीत ऐकवाव्यात.
  2. विनोदी चुटके सांगावेत किवा त्यांना सांगावयास सांगावे .
  3. काही छोट्या मुलांना जमवून बालगीते ऐकावावीत त्यांच्या साठी काही सोप्या औषधांची माहिती द्यावी.
  4. पेपरमध्ये येणाऱ्या वेगळ्या पक्षी प्राण्याची माहिती द्यावी .
  5. गायक , वादक , डॉक्टर, नट तंत्रज्ञ  छोटे कामगार यांना मिळणाऱ्या सन्मानाची माहिती द्यावी 
  6. एखाद्या नवीन चित्रपटात चांगला संदेश दिला असेल तर तो सांगावा 
  7. संकटावर स्वतःच्या शक्तीने आणि युक्तीने मात  करणाऱ्यांची माहिती सांगावी  त्यांना येणाऱ्या कलेची माहिती सांगावी.