Tuesday 23 April 2013

मायेची महती

मायेची महती 

माया आईची मऊ साईची
फुल जाईची अति कोमल
माया पित्याची वारसा देण्याची
छाया घरट्याची निरंतर
माया भावाची पाठ राखायची
भाऊबीज घालायची प्रेमभावे
माया बहिणीची राखी बांधायची
प्रेम जपण्याची आनंद मानण्याची
माया आजीची खाऊ घालायची कौतक करायची नात नातवांची
माया आजोबांची गोष्टी सांगण्याची
धाडस शिकवायची आदर्श ठेवायची
माया आत्याची लाड करायची
सोहळे पुरवायची हौस भारी
माया मावशीची गुपित सांगण्याची
हितगुज कार्याची थट्टा मस्करीची
माया मामाची कामी  येण्याची
साद प्रेमाची पाखर घाली
माया मैत्रीची गुजगोष्टी करायची
अल्लद प्रेमाची साक्ष देई
माया सजणाची स्वप्ने रंगवायची
प्रेम उधळायची एकमेकांवरी
माया गुरुरायाची भक्ती शिकवायची
भेट घडवून द्यायची  परमेशाची





माझी आजी


माझी आजी 


आमची आजी फारच भोळी
उपवासाला खाते साजूक तूप केळी
देवाला देते नेवेद्याची लाच
सारखे नवस बोलण्याची
तिला आहे आच
आंबे केळी फणसाला
बदामाची जोड
नेवेद्याला करते सारखे गोड गोड
गोड धोड खाण्याचा देवाचा पहिला मान
नंतर सवाष्ण ब्राम्हणांचा सन्मान
घरातल्या माणसांचा शेवटचा नंबर
पण मी आहे खाष्ट सर्वांआधी हजर
माझा माझा वाटा प्रथम द्यायला लावते
मगच तिला मी खायला मोकळी सोडते
आटीव दुधाचा चहा व साजूक तुपाची खिचडी
इतक्या म्हातारपणी खुटखुटीत आहे कुडी
देव आणि आजीची लागली आहे रेस
शर्यत खेळत असताना लागेल मोठी ठेच
कोण पुढे जातो पैज लागली आमची
पण मानवावर सत्ता आहे ईश्वराची



सूर सावल्या -अरविंद गजेंद्रगडकर

अरविंद गजेंद्रगडकर यांनी आयुष्यातील सुंदर सफरीची गाथा सांगितली आहे. त्यांचे मित्र, गुरु, सहकारी व सहचर यांच्या गोड सफरीचे हे वर्णन वाचताना मन प्रसन्न आणि अवीट अश्या खुशीत दंग होऊन जाते. त्यांनी घेतलेला सूर सम्राटांचा व तालबहद्दुरांचा सहवासाचा आणि त्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचा यथासांग इतिहास आपल्याला थक्क करून सोडतो. नशिबाचे योगायोग व ध्येय प्राप्तीसाठी घेतलेले कष्ट म्हणजे आयुष्याचा सुखसंवाद यशस्विता आणि यथार्त असते. जगातील सुंदर गोष्टींचा सुखद अनुभव ध्येय प्राप्तीचा आनंद व चिरकाल स्मरणात राहणारे, दिल खुश ठेवणारे सुरांचे सौंदर्य व सहवासात येणारांची मैत्री हे जीवन सुखमय करते. निसर्गातील व मानवातील सुंदर गोष्टींचा संगम आपल्या तनामनात गुंतवून आनंदात सुखात आयुष्य व्यतीत करण्याचा हा सुंदर मार्ग आहे. हा संदेश मानणारा हा महात्मा आहे. संगीत विद्या म्हणून शिकणे आणि आपल्या ज्ञानाचा फक्त चरितार्थ म्हणूनच उपयोग न करता लोकांना सुरांच्या संचाराचा मुक्त आनंद देऊन त्याचा अनुभव घेणे हि दातृत्वाची कल्पना खूप सुंदर आहे. कलेची महानता आणि व्यक्तीची श्रोत्यांना सुख आनंद मिळवून देण्याची दानत हि परमोच्च कोटीची ठेव आहे. 

 पुस्तक ठेवा